Monday, February 6, 2023

वर्गातील छोटा बालवैज्ञानिक



*आमचा छोटासा बालवैज्ञानिक*


काल अमनने मला शाळेत आल्यावर ताई रिकामा चिकटपट्टी रोल आहे का ?विचारले.तेव्हा आता सध्या नाही पण उद्या घेऊन येते सांगितले.शाळेत निघताना आठवणीने चिकटपट्टी रोलचे पाच - सहा नमूने घेतले.त्याला काहीतरी करायचे असेल म्हणून मागितले असेल असे सहज मनात आले.शाळेत गेल्यावर वर्ग उघडतानाच अमनने चिकटपट्टी रोल आणला का ? असे विचारुन डब्याच्या पिशवीत डोकावून पाहिले.अन् पठ्ठ्याने आनंदाने रोल ताब्यातही घेतला.मग पारदर्शक चिकटपट्टी,कात्री,स्केचपेन मागावून घेतले.काहीतरी करायचे असेल म्हणून मी ही  साहित्य अमनच्या ताब्यात देऊन माझ्या लिखानाला लागले.इकडे वर्गातील मुले जसजशी वर्गात येत होती तसतशी अमन काय करतोय म्हणून त्याच्या जवळ जाऊन बसत होती.सर्वांचे निरीक्षण चालू होते.अमनने प्रथमतः रिकाम्या चिकटपट्टी रोलला दोन्ही बाजूंनी सफेद चिकटपट्टी संपूर्ण गुंडाळली.चिकटपट्टीला इंद्रधनुष्याचे सात रंग स्केचपेनच्या साहाय्याने रंगवले.अमनची प्रयोग वस्तू तयार होती.तोपर्यंत हि बालके काय करतात,यावर माझे मधून मधून लक्ष होतेच.पण कळायला मार्ग नव्हता.बऱ्याच वेळेला असे निराळे उद्योग आमच्या वर्गात चालूच असतात.माझाही या गोष्टीला मुक्तपणे होकार असतो.त्यामूळे मुले बिनधास्त व्यक्त होतात.अमनने त्याची प्रयोगवस्तू   टेबलावर आणली व मोबाईलचा टाॕर्च चालू करण्यास सांगितले.मुलांनी सर्व खिडक्या,दारे बंद केली.अमनने त्याची प्रयोग वस्तू मोबाईलच्या टाॕर्चवर धरली व माझ्यासहित सर्वांनाच वर्गाच्या छताकडे बघण्यास सांगितले.अन् काय आश्चर्य छतावर मस्त इंद्रधनुष्य उमटले होते.काय भन्नाट आयडिया मुलांनी वापरली होती.प्रकाशाचे होणारे परीवर्तन थोड्याफार प्रमाणात मुलांना छान समजले होते.बिनाखर्चिक प्रोजेक्टरही मुलांचा तयार झाला होता.वर्गाचा छताचा असा प्रोजेक्टरसारखा उपयोग होऊ शकतो याची माझ्यासहीत मुलांनाही गंमत वाटली.मोबाईलच्या टाॕर्चचा वापर करुन भिंतीवर सावल्यांचे खेळ घेऊन कितीतरी प्रकारचे आकार तयार होऊ शकतात याचाही डेमोही दिला.मुलांना भारी गंमत वाटली.पूर्वी लहानपणी लाईट गेल्यावर राॕकेलच्या चिमणीच्या उजेडात विविध हातांच्या हालचाली करुन प्राण्यांचे,पक्ष्यांचे आकार तयार करण्याचा आपण सर्वांनीच अनुभव घेतलेला आहे.आजकाल लाईट कमीच जाते,गेलीतरी राॕकेलच्या चिमण्याच कालानुरुपे नष्ट झाल्याने या गमतीजमती मुलांनी अनुभवने तसे कठीणच.म्हणूनच हा हि अनुभव मुलांना दिला.मुलांनी कितीतरी विविध आकार यावेळी तयार करुन आजच्या प्रयोगकृतीचा आनंद लुटला.मागच्या महिन्यात मुलांना'उबंटू'हा चित्रपट शाळेच्या टिव्हिवर दाखवला होता.त्यातील मुलांच्या समजदारपणे वागण्याची कृती,परीसरातील साहित्यातून प्रयोग करुन पाहणे या कृती मुलांनी नक्कीच काळजीपूर्वक अंगिकारल्या होत्या.याची प्रचिती आज अनाहुतपणे आली.आपण मुलांपुढे काय ठेवतो हे ही तितकेच महत्त्वाचे.....मुले खूप विचारीआणि अनुकरणप्रिय,सजग असतात हेच आज प्रकर्षाने जाणवले.मुलांच्या सकारात्मक वृत्तीला जाणीवपूर्वक प्रोत्साहन द्यायला हे ही मनोमन वाटते.कारण शाळा ही मुलांच्या स्वप्नांना साकारस्वरुप करणारी महत्त्वाची जागा आहे.जिथे मुलांनी स्वच्छंदी फुलपाखराप्रमाणे बागडायला हवे,बिनधास्तपणे फिरायला हवे, जे जे योग्य आहे ते ते आनंदाने करायला हवे.आज अमनच्या रुपाने एक छोटासा बालवैज्ञानिक वर्गास मिळाला.अमनने वर्गात साहित्य करताना वर्गातील साईश,अजिम,कृष्णा,आयुष,पवन,नितीन,आदेश,अनिकेत,ओम,रोहित,सोमनाथ या त्याच्या मित्रांची त्याला मिळालेली साथही वाखणण्याजोगीच होती.


*श्रीम.इंगळे एस.बी.*

*वर्गशिक्षिका -इयत्ता तिसरी व सहावी*

*नगरपालिका शाळा क्र.६* *कोपरगाव जि.अहमदनगर*.


 

No comments: