Wednesday, March 31, 2021

ओळख पक्ष्यांची - सुगरण

 

'अरे खोप्यामधी खोपा

सुगरणीचा चांगला

देखा पिलांसाठी तिने

जीव झाडाले टांगला'

        ह्या बाहिणाबाई चौधरी लिखित काव्यातून सुगरणीच्या कुशल घरटे बांधणीचे कौतुक केले आहे.

          सुगरण पक्षी हा विणकर, गवळण या नावांनीही परिचित आहे. बाया सुगरण, स्ट्रेक सुगरण, ब्लॅक ब्रेस्टेड सुगरण, फिन सुगरण (पिवळा) आदी सुगरणच्या प्रजाती आहेत.

          चिमणीच्या वर्गवारीत मोडणारा हा एक छोटा पक्षी आहे.

साधारण १४/१५ सेमी आकाराचा हा पक्षी आपल्या चिमणीसारखाच दिसतो.राखाडी भुरकट रंगाच्या ह्या पक्षाचं तोंड काळं नी डोकं पिवळ्या रंगाच असतं हाच काय तो फ़रक!अर्थात हा पिवळा रंग प्रजननाच्या काळात गडद होतो. बाकी तशीच भुरकट लहान म्हणजे आखूड टोकदार नी जाड चोच, तसेच लहान मातकट रंगाचे मजबूत पाय अगदी चिउताईच जणू. ह्याच लहानशा चोचीने हा पक्षी एवढं सुंदर घरटं बनवतो. घरटं बनवायला लागणारी उर्जा आणण्यासाठी हे खातात काय? लहान किडे, धान्य, फ़ळं नी गवतांच्या बियांच्या जोडीला कधीमधी फ़ुलपाखरं, बेडकाची लहान पिल्लं, लहानसहान पालीपण खातात बाया सुगरण पक्षी.

          खेडोपाडी शेताचे बांध,माळरान इ.ठिकाणी ह्या सुगरणीची घरटी पाहायला मिळतात.ग्रामीण भाषेत ह्या घरट्यांना खोपा असे म्हणतात .झाडावर लटकणारी ही घरटी आकारानं एखाद्या बाटलीसारखी दिसतात.सुगरण हा पक्षी भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार या देशात आढळतो. पट्टेरी सुगरण, काळ्या छातीचा सुगरण आणि बाया, अशा तीन प्रकारचे सुगरण पक्षी प्रामुख्याने दिसून येतात.सुगरण पक्षाच्या घराचा आकार पालथ्या चंबूसारखा असतो. सुरूवातीला फांदीभोवती गवताचे धागे घट्ट विणून मजबूत लोंबता दोर तयार करतात. हा दोर एकट्या माणसाला तुटत नाही. त्याच्या आधारावर घरटे लोंबत ठेवले जाते. नंतर दोराच्या मोकळ्या धाग्यात दुसरे धागे गुंतवून घरटे बांधले जाते. घरटे मधोमध रूंद विणून त्याचे दोन भाग केले जातात. पहिला भाग बंद करून त्याला फुग्यासारखा आकार असतो.हा प्रतिभावान वीणकर आपले घरटे काथ्याच्या, गवताच्या धाग्यांपासून विणतो. याचा आकार पुंगीसारखा असतो. मध्ये फुगीर व खाली नळीसारखा बोगदा बसतो, ते घरटयाचे प्रवेशद्वार मधल्या फुगीर भागात वाटीच्या आकाराची शय्या असते. त्यात मऊ पिसे, कापूस असतो.दिसायला जसे मोहक असतात, तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. हे सुगरण पक्षी एखाद्या झाडावर जणू आपले गावच बसवतात. जिथे मानवी रहदारी कमी असेल किंवा आपले गाव दिसणार नाही, अशी झाडे हा पक्षी निवडतो. या एकाच झाडावर त्याची १५ ते २० जणांची वस्ती विसावते. खास आपल्या पिलांच्या जन्मासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हे सुगरण पक्षी परिश्रमाने घरटी बनवितात. विशेष म्हणजे हे घरटे गवताच्या पातीपासून बनविली जातात.

               विणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर घरटी बांधायला सुरूवात करतात. जून ते सप्टेंबर हा सुगरण पक्षाच्या विणीचा हंगाम मानला जातो. काटेरी झाडावर घरटे तयार करण्याचे काम सुगरण पक्षातील नर करतात. घरट्यासाठी लागणाऱ्या गवताच्या पात्यासाठी तो ५०० ते ६०० वेळा खेपा मारतो. घरटी बनवायला साधरण २० ते ६० सेमी लांबीचे गवताचे दोरे  ओढून काढून नर घरी आणतात. साधारण दिड दोन फ़ूट लांबीच एक घर बनवायला बाया नराला साधारण २५/२६ दिवस लागतात. घराच विणकाम करायला नर स्वत:च्या चोचीचा वापर करतो. या घरट्याचा मध्यभाग फ़ुगीर असतो जिथे अंडीपिल्ली रहातात. वाऱ्याने हे हलकं घर हलून पिल्लं खाली पडू नयेत म्हणुन नर आपल्या चोचीने चिखलाचे बारीक बारीक गोळे करून त्यांनी विणलेल्या घराच्या आतून लावतात. ह्या वजनाने घरटं वजनदार बनतं. कित्ती विचार करतात ना हे पक्षी? पक्षी निरिक्षकांनी नोंदी केल्या आहेत की सुगरण नर दक्षिणपश्चिमेच्या दिशेने घरटी करतात कारण परतीच्या म्हणजेच रिटर्न मोन्सूनचा त्रास घरट्यास होत नाही. निसर्गाने दिलेली चतूर बुद्धी नर घरटी बनवताना वापरतात. नेहेमी काटेरी झाडं किंवा पामच्या झाडावर ही घरटी बनवली जातात.

धान्य, किडया, मुंग्या खात असल्याने त्यांची उपलब्धता असलेल्या शेतातील माडाच्या झाडांवर काटेरी झुडपावर तो घरटी बांधतो. यासाठी तो अशी जागा निवडतो की तेथे साप, शिकारी पक्षी पोहोचणार नाहीत. हा वसाहत करून कळपाने रहाणारा पक्षी असल्याने एकाच झाडावर त्याची वीस पंचवीस घरटी लोंबकळताना दिसतात.ह्याच जोडीला ही घरटी पाणवठ्यावर बनवलेली असतात कारण अशाने भक्षकांचा त्रास घरट्यास होत नाही. तरूण नवथर नर पाणथळीच्या जागी घरटी बनवायचा सराव करतात.त्याचे घरटे मोठमोठया वादळ वा-यात पावसातही तग धरून वा-याच्या झोताबरोबर हेलकावत राहते आणि निसर्गातील या आश्चर्याने आपण निसर्गातच रमून जातो.

             विणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर घरटी बांधायला सुरूवात करतात. काटेरी झाडावर घरटे तयार करण्याचे काम सुगरण पक्षातील नर करतात.  घरटे बांधण्याच्या कामी नराचा मोठा सहभाग असतो. घरट्याचा काही भाग पूर्ण होण्याच्या सुमारास मादीचा थवा तिथे येतो आणि घरट्याच्या बांधणीवरून नराची निवड करतो.आकर्षक घरटे बांधत असताना सुगरण पक्षी पंख फडफडवीत आवाज काढत मादी पक्षाला साद देतो. घरटे पहायला बोलावतो. मादी सुगरण येते. घरटे न्याहाळते. घरटे पसंत पडल्यास ती त्या नराला वरते. त्यांच्या विणीचा हंगाम जूनमध्ये सुरू होतो व सप्टेंबपर्यंत चालतो. मादी घरटयात दोन ते चार पांढरी शुभ्र अंडी घालते व पिल्ले जन्म घेतात.

              पित्याने मेहेनतीने विणलेल्या या सुबक बंगल्यात यांची पिल्लं खूप दिवस रहात नाहीत. जेमतेम १८च दिवस इथे राहून ही भूर्र्र्र्र्र्र्र्र्र उडून जातात. जातात म्हणजे २/३ किमी च्याच परिसरात रहातात….एवढ्या कमी काळासाठी ही सगळी विणाविण नी जन्माचा शीण….गम्मत म्हणजे सुगरण पक्षाने सोडून दिलेल्या घराट्यात बऱ्याच वेळेस मुनिया पक्षी नांदतात.खेड्यापाड्यात आढळणारा हा पक्षी लोकांच्यात फारच प्रसिद्ध  आहे.सुंदर घरटं बांधणारा एक कुशल पक्षी म्हणून ह्याची जनमाणसात नोंद आहे. दैनंदिन आयुष्यात सुगरणींचे खोपे सगळ्यांनी ठिकठिकाणी बघितले असतात. सुगरण पक्षी कसा दिसतो, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते, पण त्याचे अत्यंत काटेकोर विणलेले घरटे मात्र सगळ्यांच्याच परिचयाचे असते. सुंदर घरटी बांधण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुगरण पक्ष्यांची मोजणी  पर्यावरण दिनी म्हणजे ५ जूनला करण्याचा उपक्रम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी रा‌बवत असते.. सुगरण पक्ष्यांची कमी होत जाणारी संख्या लक्षात घेऊनच या उपक्रमाचे आयोजन देशभरात केले जाते.

Tuesday, March 30, 2021

ओळख पक्ष्यांची - बुलबुल


 बुलबुल मनुष्यवस्तीमध्ये आढळणारा, झाडाझुडपांवर दिसणारा व टोपी घातल्यासारखा वाटणारा लांब शेपटीचा एक पक्षी आहे.  पिक्नोनोटस प्रजातीतील सर्व पक्ष्यांना सामान्यपणे बुलबुल म्हणतात. भारतात पिक्नोनोटस कॅफर असे शास्त्रीय नाव असलेली बुलबुल पक्ष्याची जाती सर्वत्र आढळते. दक्षिण आशियातील भारत, पूर्व श्रीलंका, म्यानमार आणि ईशान्य चीन या ठिकाणी उष्ण प्रदेशात तो निवासी आहे. पॅसिफिक महासागरातील अनेक बेटांवर, काही आखाती देशांत आणि न्यूझीलंडमध्ये अलीकडे तो आढळत असून तेथे स्थिरावला आहे. त्याच्या शेपटीच्या बुडाखाली लाल रंगाचा डाग असतो, म्हणून त्याला लालबुड्या बुलबुल (रेड व्हेंटेड बुलबुल) असेही म्हणतात.

              बुलबुल हा चिमणीपेक्षा मोठा व साळुंकीपेक्षा लहान असून त्याची लांबी सु. २० सेंमी. असते. डोके आणि गळा हे भाग तकतकीत काळ्या रंगाचे असून शरीर आणि पंख फिकट तपकिरी असतात. पंख, पाठ आणि छातीवरील पिसांच्या कडा पांढऱ्या असल्यामुळे शरीरावर खवले असल्याचा भास होतो. पोटाकडचा आणि पाठीचा मागचा भाग पांढरा असतो. 

           बुलबुल या पक्षाची चोच काळी असते आणि त्याचे डोके सुद्धा काळे रंगाचे असते त्याची शेपूट तपकिरी रंगाची असते बुलबुल या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

       बुलबुल हे पक्षी मध्यम आकाराचे आणि थव्याने राहणारे पक्षी आहेत हे पक्षी खूपच गोंगाट करणारे असतात मुख्य बुलबुल हे पक्षी फिक्या रंगाचे लांब आणि हिरव्या पिसांचा पक्षी आहेत. या पक्षाची चोच लहान किंवा मध्यम आकाराचे असते आणि थोडीशी बाकदार असते. त्याचे पाय खूपच लहान असतात त्याचे पंख लहान व गोल असतात.

                  बुलबुलची मुख्य प्रजाती आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आढळते.काळ्या शेंडीचा बुलबुल हा गोवा राज्याचा राज्य पक्षी आहे.बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत दडविलेले असते. बुलबुल  एकावेळी २ ते ५ अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उबविणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.बुलबुल या पक्षाचे खाद्य  प्रामुख्याने हा पक्षी झाडावरची फळे छोटे कीटक मध हे बुलबुलचे मुख्य अन्न आहे किंवा खाद्य आहे.खुले वन व झुडपे असणाऱ्या माळरानात, शेतात आणि मनुष्यवस्तीच्या जवळपास झाडाझुडपांवर बुलबुल आढळतो. बहुधा तो जोडीने वावरतो. फळे, फुलांच्या पाकळ्या, मकरंद आणि कीटक हे त्याचे भक्ष्य आहे. वडाची व पिंपळाची पिकलेली लाल फळे खाण्यासाठी आणि शेवरीच्या फुलातील मकरंद पिण्यासाठी त्या झाडांवर बुलबुलांचे थवे जमतात.सर्वसाधारणपणे बुलबुल या पक्ष्यांचा प्रजनन काळ जून ते सप्टेंबर हा असतो निरनिराळ्या प्रदेशांमध्ये तो पुढे-मागे सुद्धा होऊ शकतो.बुलबुल हे पक्षी जोमदार आवाजात  गाणारे म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच हे पक्षी मोठ्या प्रमाणात पाळले जातात.

Monday, March 29, 2021

पक्ष्यांची ओळख - घुबड


 घुबड हा जगभर आढळणारा एक पक्षी आहे. जगभर त्यांच्या सु. २०० पेक्षा अधिक जाती आहेत. भारतात त्यांच्या आठ-दहा जाती आढळतात. घुबडाला भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते. परंतु बरेच लोक घुबडला भीत असल्या -मुळे या भीतीपोटीच त्याला अशुभ मानले जाते. घुबड हे भक्षक पक्षी आहेत; ती लहान प्राण्यांना ठार करून खातात. तरीही वैज्ञानिक त्यांचे नाते ससाणा व शिकरा अशा भक्षक पक्ष्यांच्या जवळचे आहे असे मानत नाहीत.

        भारतात सामान्यपणे पांढरे घुबड आढळते. त्याचे शास्त्रीय नाव टायटो आल्बा आहे. त्याचबरोबर शृंगी घुबड आणि मासे खाणारे तपकिरी घुबडही आढळते. साळुंकीएवढे लहान घुबडही भारतात सर्वत्र आढळते. महाराष्ट्रात याला पिंगळा म्हणतात. एल्फ आउल हे जगातील सर्वांत लहान घुबड मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळते. त्याची लांबी सु. १५ सेंमी. असते. सर्वांत मोठया घुबडाचे नाव ग्रेट ग्रे आउल असून त्याची लांबी सु. ७२ सेंमी. असते. या जातीची घुबडे यूरोप, आशिया व उत्तर आफ्रिकेत आढळतात.घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील प्रमुख पक्षी आहे. घुबडे बहुधा एकाकी आणि निशाचर असतात. घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी, कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजातींनी मासे मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे.

                    महाराष्ट्रात पंधरापेक्षा जास्त प्रकारच्या घुबडांची नोंद झाली आहे. अधिवासानुसार घुबडांचे प्रकार बदलतात. केवळ भारतात आढळणारी रक्तलोचन घुबड आणि वन पिंगळा ही दोन्ही प्रदेशनिष्ठ घुबड महाराष्ट्रात सापडतात.शृंगी घुबड आणि मासे खाणारे तपकिरी घुबड या घुबडांच्या दोन जाती भारतात सगळीकडे आढळतात. ही दोन्ही घारीएवढी मोठी असतात. रात्री अपरात्री आपल्याला घू घू असा जो घुमणारा आवाज ऐकू येतो तो शृंगी घुबडाचा असतो. याच्या डोळ्यांच्या वरच्या बाजूस पिसांचे दोन झुपके असतात. ते शिंगासारखे दिसत असल्यामुळे याला शृंगी घुबड हे नाव मिळाले असावे. मासे खाणारे घुबड फक्त मासे खाते. एक साळुंकीएवढे लहान घुबड भारतात सर्वत्र आढळते. त्याला पिंगळा  म्हणतात.

             घुबड च्या डोळ्यांची रचना इतर पक्षांच्या तुलनेत जरा वेगळीच असते घुबडाचे डोळे समोर असतात आणि त्यांची रचना गोल नसून ट्यूब सारखी असते.घुबड डोळे हलवू शकत नाही. म्हणून आजूबाजूला बघण्याकरिता तिला डोके पूर्ण फिरवावे लागते. घुबडच्या मानीत १४ मनके असतात. त्याच्यामुळे घुबड त्यांची मान २७० अंश फिरवू शकतात.घुबडचा चेहरा गोल चपटा असतो आणि त्यांची चोच लहान असली तरी ती खूप शक्तिवान असते.  घुबडाची ऐकण्याची क्षमता देखील अतिशय उत्तम असते. घुबडांचे कान असमान असतात आणि डोक्यावर वेगवेगळ्या अंतरावर असतात. ज्यामुळे ध्वनीलहरींमधील थोडासा फरक सुद्धा त्यांना सावजाचे अचूक ठिकाण ओळखण्यास मदत करतो.

घुबडांच्या डोक्यावर असलेली पिसे सुद्धा घुबडाला ध्वनीलहरींना दहापट मोठे करून कानापर्यंत पोहचवतात.तसेच घुबड सर्वात आधी मोठ्या शक्तिशाली पिल्लांना अन्न पुरवतो व नंतर कमजोर पिलांना अन्न पुरवतो. हे पिल्ले मोठी झाल्यावर उडून जवळपासच्या झाडावर राहायला जातात. तिथे ही काही वेळा हे घुबड पिल्लाला अन्न पुरवतो.अंडी आकाराने गोल आणि पांढरी असतात.या अंड्यातून पिले बाहेर आल्यानंतर ४ – ५ आठवडे घरटयात राहतात.घरटयातून बाहेर पडल्यानंतर पिले काही आठवडे त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. या काळात पिले उडायला आणि शिकार करायला शिकतात.

            घुबडे स्वत: घरटे बांधत नाहीत. त्याऐवजी ते ससाण्यांच्या किंवा कावळ्यांच्या जुन्या घरटयांचा वापर करतात. घुबडे झाडांच्या ढोलीत, गुहेच्या किंवा उंच कडयांच्या कपारीत, जमिनीत खड्डे करून किंवा जमिनीखाली बिळात तर काही धान्याच्या गोदामांत किंवा चर्चच्या घंटाघरातही राहतात.

             घुबडे लहान सस्तन प्राणी खातात. तसेच ती पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे, कीटक आणि कृमीदेखील खातात. कृतक प्राण्यांचा त्यांच्या आहारात प्रमुख समावेश असतो. मोठ्या आकाराची घुबडे काही वेळेला सशासारखे प्राणी उचलून नेतात. काही उथळ पाण्यातील मासे खातात. ससाण्याप्रमाणे घुबडे मोठ्या आकाराचे भक्ष्य तुकडे करून खातात. परंतु भक्ष्य लहान असल्यास ते अखंड गिळतात.लहान घुबडे किडे, लहान उंदीर व पक्षी खातात परंतु मोठी घुबडे ससे, घुशी, पक्षी, साप इत्यादींवर उपजीविका करतात काही घुबडे मासे, बेडूक, खेकडे वगैरे खातात. भक्ष्य मोठे असले, तर चोचीने त्याचे लचके तोडून ते खातात, पण लहान प्राणी ते सबंध गिळतात. अन्नाचे पचन झाल्यावर भक्ष्याची हाडे, पिसे, केस व इतर न पचणाऱ्या पदार्थांचे लहान गोळे बनतात व घुबड ते ओकून टाकते.

       घुबड शेतकऱ्यांसाठी उपयोगी पक्षी आहे. पिकांची नासधूस करणारे उंदीर, घुशी, ससे आणि कीटकांना खात असल्यामुळे घुबडे माणसाला उपकारक ठरली आहेत. दिवसा घुबड आजूबाजूच्या वातावरणा प्रमाणे स्वतःला बदलतात आणि आरामात राहतात.घुबडाचे वेदकालीन नाव उलूक आहे. पुराणात घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले आहे. हिंदू समाजात घुबड दिसणे किंवा त्याचे ओरडणे अशुभ मानतात. अनर्थाचे पूर्व चिन्ह म्हणून त्याचा पुष्कळदा उल्लेख केलेला आढळतो. याच्या उलट प्राचीन ग्रीसमध्ये घुबड हे शास्त्र व कला यांच्या वास्तव्याचे दर्शक चिन्ह होते.

Sunday, March 28, 2021

ओळख पक्ष्यांची - राजहंस


                                           'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख',होते कुरुप वेडे पिलू तयात एक' हि कविता आपण ऐकलेली आहे.त्यातल कुरुप वेडे पिलू म्हणजे च राजहंस होय.राजहंस हा पक्षी प्रेमाचा व विश्वासाचा प्रतीक मानला जातो. राजहंसाच्या सौंदर्यामुळे आणि डौलदारपणामुळे त्याला अनेक संस्कृतींमध्ये व विविध धर्मांमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे.राजहंसाच्या सौंदर्यामुळे आणि डौलदारपणामुळे ललित वाङ्मयात फार पूर्वीपासून स्थान मिळाले आहे आणि त्याच्याबद्दल तो मोत्यांचा चारा खातो. दूध-पाणी मिसळून ठेवल्यास पाणी वगळून फक्त दूध पितो, मरणाची त्याला आधीच चाहूल लागते व त्यानंतर तो स्वर्गीय सुस्वर काढायला सुरुवात करतो वगैरे दंथकथादेखील प्रचलित आहेत.

          जगभरात राजहंस पक्ष्याच्या ६–७ जाती आढळतात. प्रामुख्याने तो समशीतोष्ण प्रदेशात आढळतो. त्याच्या चार जाती उत्तर गोलार्धात, एक जाती ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे, तर एक जाती दक्षिण अमेरिकेत आढळते. मात्र आशिया, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तर भाग व आफ्रिका खंड यांसारख्या उष्ण प्रदेशांत तो निवासी नाही.  इतर सर्व  पाणपक्ष्यांमध्ये राजहंस हा आकाराने सर्वांत मोठा व वजनाने जास्त असतो; इतर कोणताही पक्षी त्याच्याइतक्या वेगाने लांब अंतर पोहू किंवा उडू शकत नाही.

            राजहंस निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढू शकतात. त्या आवाजावरून त्यांना श्रृंगवाकू , शीळ घालणारा , खोकणारा  अशी निरनिराळी नावे दिलेली आहेत. मूक हंस म्हणून ओळखला जाणारा राजहंसदेखीस फिस्कारल्यासारखा, डुरकल्यासारखा, घोरल्यासारखा असे आवाज काढू शकतो.

                   राजहंसाचे घरटे ओबडधोबड जमिनीवरच्या खळग्यात जमवलेल्या पानांच्या ढिगाऱ्याचे असते. अगदी क्वचित ते लवदार पिसांनी ते आच्छादिलेले असते. मादी एकावेळी सु. ६–८ फिक्कट पिवळट रंगाची अंडी घालते. मादी अंडी उबवते त्यावेळी नर तिचे व अंड्याचे रक्षण करतो क्वचित नरदेखील अंडी उबविण्यास मदत करतो. शत्रूला पळवून लावल्यानंतर विजय जाहीर करण्यासाठी मोठा आवाज करतो. पिल्ले आखूड मानेची असनू त्यांना मऊ लवदार पिसे असतात. पिल्लांचा रंग फिक्कट तपकिरी किंवा फिक्कट पिवळट करडा असतो. जन्मल्यापासून काही तासातच पिल्ले पोहू व उडू शकतात. 

              सामान्यत: राजहंसाचे मोठे थवे आढळतात.साधारणपणे एप्रिलच्या मध्यावर ते घरटे बांधायला सुरुवात करतात. पाणवनस्पती, गवत, पानांचा ढिगारा आदींचा वापर करून ते उंचवट्यावर घरटे बांधतात. घरट्याच्या सभोवताली २०–३० फूट लांबीचा मोठा पाण्याने भरलेला खळगा असेल, हे पाहिले जाते. ज्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळते. तिसऱ्या ते चौथ्या वर्षी राजहंस प्रौढ होतो. नैसर्गिक परिस्थितीत राजहंस २०–३० वर्षे, तर पाळल्यास सु. ५० वर्षांपर्यंत जगतो.

                 राजहंस प्रामुख्याने शाकाहारी आहे. तो आपले अन्न पाण्यात व जमिनीवर मिळवितो.  पाणवनस्पती हे त्याचे मुख्य अन्न असून तो पाण्यात बुडी न मारता आपले अन्न खेचून वर काढतो. त्याच्या अन्नात पाणवनस्पतीची मुळे, कंद, खोड व पाने इत्यादींचा समावेश असतो. पिल्ले लहान असताना प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी ती पाण्यातील कीटक खातात. ४–६ आठवड्यांनंतर त्यांचा आहार प्रौढ राजहंसाप्रमाणे पूर्णपणे शाकाहारी होतो. पाळलेले राजहंस तृणधान्ये व गवताचे बी देखील खातात.

             राजहंसाची डौलदार लांब मान, निमुळते परंतु मजबूत शरीर व शरीराच्या मागील बाजूस असलेले मोठे पाय ही त्याची लक्षणे आहेत. इतर पाणपक्ष्यांप्रमाणे त्याच्या पायांच्या बोटांमध्ये पडदा असून त्याचा उपयोग पोहताना होतो. चोच मोठी व चपटी असून वेगवेगळ्या जातींमध्ये चोचीच्या रंगांमध्ये बदल दिसून येतात. या पक्ष्यांना दात नसतात; परंतु चोचीला करवतीसारख्या कडा असतात. काही राजहंसांच्या चोचीच्या बुडाशी मोठी मांसल गोळीसारखी वाढ असते. राजहंस संथ परंतु डौलदारपणे पोहतो. तो सावकाशपणे पंख वरखाली करत व आपल्या लांब मानेला पूर्ण ताण देत उडत राहतो. दीर्घ अंतर पार करत तो जास्त उंचीवर जातो व थव्याने इंग्रजी ‘V’ आकारात उड्डाण करत राहतो.

 

Friday, March 26, 2021

ओळख पक्ष्यांची - बदक

 


एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

होते कुरुप वेडे पिल्लू तयात एक 


           हि कविता  आपण लहानपणी नक्की ऐकलेली असणार.

            सुंदर व रुबाबदार  दिसणारा एक उभयचर पक्षी म्हणजे बदक.  बदक हा पक्षी जमीन व पाणी दोन्ही ठिकाणी संचार करू शकतो. बदक हंसापेक्षा लहान आणि शरीराने स्थूल असते. मान आणि पाय आखूड असतात. पाय शरीराच्या बऱ्याच मागच्या बाजूला असतात. त्यांचा रंग पिवळा असून त्यांच्यावर पुढे तीन व मागे एक बोट असते; पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात. चोच मोठी, रुंद, चापट व पिवळी असते; ती पातळ त्वचेने झाकलेली असते. चोचीच्या दोन्ही कडांवर बारीक दात असतात.सामान्यतः नर व मादी यांच्या शरीराची रंगव्यवस्था वेगळी असते. पाळीव बदकांचा रंग सामान्यपणे पांढरा असतो;पण काहींचा काळा किंवा तपकिरी असून त्यात हिरवट चमक असते; काहींचे धड पांढरे पण डोके व मान काळी असते. अंगावरील पिसे अतिशय दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तेलग्रंथीचा स्त्राव बदके आपल्या चोचीने पिसांना नेहमी चोपडतात; त्यामुळे पाण्यात पोहताना ती पाण्याने भिजत नाहीत. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून निवारण होऊन शरीराची उष्णता कायम रहाते. पिसे दर वर्षी गळून पडून नवी येतात.भारतात आसाम, केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा येथे मोठ्या प्रमाणात बदक आढळतात. तसेच महाराष्ट्रातही बऱ्यापैकी बदकांचा वावर आहे. पिवळ्या रंगाच्या, मोठी रुंदी व चापट चोचीमुळे ओळखल्या जाते.   भारतातही काही ठिकाणी कोंबड्यांप्रमाणे बदक पाळली जातात. म्हणजेच बदक पालन व्यवसाय केला जातो. 

                                 कोंबड्याप्रमाणे अंडी व मांस यांच्या उत्पादनासाठी बदके जगामध्ये सर्वत्र पाळली जातात. तथापि व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर ती फारच कमी प्रमाणात पाळण्यात येतात. भारतामध्ये बदके मुख्यत्वे अंड्यांसाठी पाळण्यात येतात. साधारणपणे दमट हवामानामध्ये हा व्यवसाय केला जातो. समुद्र किनार्‍यालगत किंवा ज्या भागात भाताचे पीक जास्त होते अशा भरपूर पाऊस पडणार्‍या भागामध्ये बदक पालन चांगले करता येते. म्हणजे कोकण हा भाग बदक पालनासाठी अनुकूल आहे. बदकाच्या पालनात कोंबडी पालनापेक्षा काही जास्त फायदे आहेत. बदकांना कोंबडीपेक्षा कमी खाद्य लागते. बदकाचे पालन पिंजर्‍यात न करता साचलेल्या किंवा साचवलेल्या पाण्यात केले जात असल्यामुळे त्यांना पाण्यातच बरेचसे खाद्य सापडते. कोंबडीपेक्षा बदकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि बदकांची अंडी देण्याची क्षमताही जास्त असते. बदकाची मादी कोंबडीपेक्षा वर्षाला ४० ते ५० जास्त अंडी देतात, शिवाय बदकाचे अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा १५ ते २० ग्रॅम जास्त वजनदार असते आणि त्यामध्ये कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक पोषक द्रव्ये असतात. बदक सर्वभक्षक आहे. बदक गवत, पाने, फळे आणि बारीक मासे सुद्धा खातात. ज्यामुळे बदकांना खाद्य नेहमी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.

        भारतामध्ये बदकांच्या पुढील जाती आढळून येतात.इंडियन रनर, सिल्हेट मेटा व व्हाइट ब्रेस्टेड नागेश्वरी. इंडियन रनर बदके पांढऱ्या रंगाची असतात, तर सिल्हेट मेटा बदके तपकिरी रंगाची असून त्यांच्या पंखांची टोके काळी असतात व चोच पिवळी असते. नागेश्वरी जातीच्या बदकांचे शरीर काळ्या रंगाचे असते; पण छाती व गळा पांढरा असतो. बदकांच्या अनेक जाती आहेत.पिनटेल बदक,मलार्ड बदक,स्पॉटबिल बदक,शोव्हेलर,ब्राम्हणी बदक,गुलाबी डोक्याचे बदक. बदके चांगली पोहतात आणि बुड्याही मारतात. जमिनीवर ती डुलतडुलत चालतात. ती वेगाने उडू शकतात. त्यांच्या काही जाती प्रजननासाठी शेकडो किमी. अंतर दूर उडत जातात. पाण्यातील व जमिनीवरील लहान प्राणी, कीटक, धान्य, बी आणि रसाळ मुळे हे त्यांचे अन्न आहे.

ओळख पक्ष्यांची - बगळा

 


एखाद्या पाणवठ्याजवळ एखाद्या ऋषीप्रमाणे स्थितप्रज्ञ समाधी लावल्यासारखा एखादा पक्षी दिसला कि,तो हमखास बगळाच असतो.बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. त्याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण  गोष्ट म्हणजे त्याचा रंग संपूर्ण पांढरा  असतो. बगळा साधारणपणे पाणथळी जागेत आढळून येतो. याला इंग्रजीत इग्रेट (Egret) असे म्हणतात.बगळे मध्यम ते मोठ्या आकारमानाचे असतात. यांची मान, पाय व बोटे लांब व सडपातळ असतात. यांच्या मानेच्या मणक्याची रचना अशी असते की,मान फक्त  उभ्या पातळीत हलविता येते. ती बाजूस वळू शकत नाही. हा पक्षी " विश्रांती घेत असताना त्याची मान इंग्रजी एस् (S) अक्षराच्या आकाराची होते व डोके दोन खांद्यांच्यामध्ये असते. भक्ष्य पकडण्याच्या वेळी मान सरळ केली जाते. हे पक्षी व यांचे जवळचे संबंधी उडताना आपली मान मागे व डोके दोन खांद्यांच्या मध्ये ठेवून उडतात. यामुळे उडते पक्षी बगळे आहेत की नाहीत, हे दुरून सहज ओळखता येते. यांची चोच लांब, सरळ व खंजिरासारखी असते. भक्ष्य पकडण्यास हिचा चांगला उपयोग होतो.  छातीच्या पंखांच्या आत चूर्ण भरलेले लहान पंख असतात. हे चूर्ण चोचीच्या साह्याने मोठ्या पंखावर पसरवून हा पक्षी आपले खराब झालेले पंख स्वच्छ करतो. हे करण्यात तो आपल्या मधल्या नखाचाही उपयोग करतो. हे चूर्ण घासल्यावर पंखावर पाणी थांबत नाही.

          बगळ्यांचे अनेक प्रकार आहेत. रंगांवरून बगळ्यांना राखी बगळा, जांभळा बगळा आणि पांढरा बगळा अशी नावे आहेत. पांढऱ्‍या बगळ्यांमध्ये आकारावरून मोठा, मध्यम आणि लहान असे प्रकार पडले आहेत. अधिवासावरूनही गायबगळा, पाणबगळा व रात्रीच्या वेळी बाहेर पडणारा म्हणून रातबगळा अशी नावे पडली आहेत. या सर्व बगळ्यांच्या प्रजाती आणि जाती वेगवेगळ्या आहेत. इंग्रजी भाषेत इग्रेट व हेरॉन अशीही नावे बगळ्यांसाठी सर्वसाधारणपणे वापरली जातात. कीटकांना खाण्यासाठी गायबगळे  जनावरांबरोबर दिसून येतात. बऱ्‍याच वेळा ते गायीच्या पाठीवर बसून भक्ष्य मिळवितात. गायीच्या पायांमधून आतबाहेर उड्या मारत व फिरत ते खाद्य पकडतात.बगळ्यांचे टोळ, माश्या, गोमाश्या व गोचीड इ. त्यांचे मुख्य अन्न आहे. तसेच ते मासे, बेडूक व सरडे यांची पिलेही खातात.

                 बगळे दलदलीच्या प्रदेशात, पाण्याजवळ किंवा समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. ते सर्वसाधारण समूहाने राहतात. यांची घरटी पाण्याजवळच्या झाडांवर किंवा दूरही असतात. पुष्कळ घरट्यांची मिळून एक वसाहत असते.  ते पाण्याच्या पृष्ठावरून अगदी जवळून उडतात किंवा उथळ पाण्यातून हळूहळू चालत जातात अगर एके ठिकाणी स्वस्थ उभे राहतात. हे सर्व करीत असताना त्यांची दृष्टी भक्ष्याकडे असते. जर एखाद्या मासा किंवा बेडूक दिसला की, झडप घालून ते पटकन चोचीने उचलतात.

              संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बगळे टोळके करून किंवा तिरक्या ओळी करून झाडांवरील घरट्याकडे परतताना दिसतात. त्यांची घरटी काटक्यांनी तयार केलेली असतात. त्या झाडांवर पाणकावळे, कावळे आणि मैना यांचीही घरटी असतात. बहुधा त्यांची घरटी एखाद्या मोठ्या परिसरात वसाहतीप्रमाणे असतात. त्यांच्या विणीचा हंगाम उत्तर भारतात जून-ऑगस्ट, तर दक्षिण भारतात नोव्हेंबर-मार्च असा असतो. मादी एका खेपेला ४-५ अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा असून त्यांवर निळ्या अथवा हिरव्या रंगाची झाक असते. एक महिन्यानंतर अंड्यांतून पिले बाहेर येतात. साधारणपणे दोन महिन्यांनी पिले उडू लागतात.

                  बगळयाचा रंग पांढरा आणि मान लांब असते. बगळे पाण्यात बराच वेळ उभे राहतात आणि स्वत:चे खाद्य शोधतात. लबाड बगळे भक्ष्य पकडण्याच्या वेळी जणू काही ध्यानस्थ असतात. बगळयांच्या पांढर्‍या रांगा आकाशात मोत्याच्या माळेप्रमाणे शोभून दिसतात.

Thursday, March 25, 2021

ओळख पक्ष्यांची - कबुतर


 आपल्या  भारत देशामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. जसे कि, पोपट, मैना, कोकीळ, घार, असे अनेक पक्षी दिसून येतात. त्या सर्वांपैकी कबुतर हा एक सर्वसामान्य पक्षी आहे.

               कबुतर हा एक सुंदर पक्षी आहे आणि हा पक्षी संपूर्ण जगात आढळून येतो.  कबुतर या पक्ष्याला पारवा या नावाने सुद्धा ओळखले जाते.सामान्यपणे आकाराने मोठ्या असणार्‍या जातीला कबूतर म्हणतात, तर लहान आकाराच्या जातीला होला म्हणतात. उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेश वगळता कबूतरे जगभर सर्वत्र आढळतात. उष्ण प्रदेशात ती विपुल असतात.

कबूतराचे अंग गुबगुबीत व आटोपशीर असून त्याच्या शरीरावरील पिसे दाट व मऊ असतात. डोके शरीराच्या मानाने लहान असते. पंख आखूड किंवा लांब असतात. शेपटी टोकदार, गोल किंवा बोथट असून लांबीला कमी-जास्त असते. कबूतराची चोच काहीशी लहान व टोकाला कठिण मात्र बुडाला मऊ असते. पाय बहुधा आखूड असतात. डोळ्यांचा रंग गुंजेसारखा लाल असतो.कबुतर या पक्ष्याला एक चोच असते आणि दोन पंख असतात. हे पंख कबुतराला उडण्यासाठी मदत करतात. कबुतर हा पक्षी साधारणपणे ३० से. मी आकार मानाचे असतात.  हे पक्षी निळ्या, राखाडी व सफेद रंगाचे असतात.

हा पक्षी साधारणपणे मोठी शहरे,खेड्यात,शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती व किल्ले याठिकाणी सहज पाहायला मिळतात. कबुतर पक्ष्याच्या पंखांवर दोन काळे आणि रुंद पत्ते असतात. तर शेपटीच्या भागावर काळा रंग असतो. त्यांच्या मानेवर आणि गळ्यावर हिरव्या व जांभळ्या रंगाचे चमकदार ठिपके असतात. कबुतराच्या पंखाखाली पांढरा रंग असतो आणि चोच ही काळ्या रंगाची असते.

कबुतर पक्ष्याचे डोळे आणि पाय हे लाल रंगाचे असतात. नर आणि मादी हे दोन्ही दिसायला सारखेच असतात. कबुतर हा पक्षी गुटूर – गू, गुटूर – गू असा आवाज काढतो. कबुतर हा पक्षी प्रामुख्याने धान्य खातो. जसे कि ज्वारी, पांढरी करडी, काळे हरभरे, शेंगदाणे आणि गहू सुद्धा खातो. कळ्या व छोटी फळे खातो मात्र पुष्कळ जाती कीटक व लहान गोगलगायी खातात. धान्यासोबत कबूतरे बारीक खडेही खातात. 

            कबुतर हा पक्षी भरपूर शांत स्वभावाचा असतो. म्हणून या पक्ष्याला ‘शांतीचे प्रतीक’ असे म्हटले जाते.माणसाने कबूतरांचा अनेक कारणांसाठी उपयोग करून घेतला आहे. प्राचीन काळापासून पाळण्यात आलेल्या प्राण्यांपैकी कबूतर हा एक आहे. कबूतरांचे मांस स्वादिष्ट असल्यामुळे खाण्यासाठी उपयोग करतात. पाश्चात्य देशांत तर हल्ली यांच्या मांसाचा पुरवठा करण्याकरिता कबूतरसंवर्धन हा एक मोठा उद्योग झालेला आहे. रोमन लोकांनी त्याचा अन्न म्हणून वापर करण्याबरोबरच संदेश पाठविण्यासाठी प्रथम उपयोग केला. संदेशवहनासाठी कबूतरांची एक विशिष्ट जातीची निपज केली जाते.  दोन्ही महायुद्धांत कबूतरांचा संदेशवाहक म्हणून उपयोग करण्यात आला. बेल्जियममध्ये कबूतरांचे अनेक क्लब आहेत.  तसेच प्राचीन काळी कबुतरांचा उपयोग हा संदेशवहन करण्यासाठी केला जातो. जसे कि पत्र आणि चिट्ठी नेऊन पोहचवणे. युद्धाच्या वेळी सुद्धा कबुतरांचा उपयोग केला जात असे.

              कबुतर या पक्ष्याचा प्रजनन काळ हा लगबग संपूर्ण वर्षभर असतो. हा पक्षी मिळतील त्या वस्तू एकत्र करून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेले घरटे हे पक्षी वापरतात.कबुतर या पक्ष्याच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील कोलंबा येथील लिव्हिया डोमेस्टिका ही प्रजाती सर्वात जास्त माणसाळलेली आहे.

          काही लोक कबुतरांचे पालन – पोषण करतात, ज्याला ‘कबुतर खाना’ असे म्हटले जाते. तसेच या ठिकाणी त्यांचे खाद्य सुद्धा उपलब्ध करून दिले जाते.

Tuesday, March 23, 2021

ओळख पक्ष्यांची - घार

 


                       घार हा पक्षी सर्वांच्याच परीचयाचा आहे.घार हि एक शिकारी पक्ष्याची जात आहे. घार हा पक्षी आकाराने गिधाडापेक्षा काहीसा लहान असून त्याची लांबी ५० – ६० सेंमी. असते. तिच्या अंगावर भरपूर पीसे असतात.रंग तपकिरी असतो. डोके बसके, चोच आकडीसारखी आणि काळी असते. चोचीच्या बुडाकडील मांसल भाग पिवळसर; डोळे तपकिरी असून अतिशय तीक्ष्ण असतात. पाय आखूड व पिवळे असून  नख्या तीक्ष्ण व काळ्या, पंख लांब व टोकदार आणि शेपूट लांब व दुभागलेले असते. आकाशात उडताना दुभागलेल्या शेपटीमुळे हा पक्षी इतर पक्ष्यांपासून ओळखता येतो. घार एकटी व चार-पाचच्या गटात भटकत असते.ती आकाशात उंचावरुन घिरट्या घालत खाद्य शोधते.

           घारीचे अनेक प्रकार असून सामान्यपणे साधी घार,ब्राम्हणी घार,काळी घार व कापशी घार हे प्रकार आढळतात.काळी घार अथवा कापशी घारीची शेपटी दुंभगलेली असते.त्यामूळे उडत असाताना घार सहज ओळखता येते.

          घार माणसाच्या सहवासात राहणारी आहे. दाट वस्तीच्या शहरात किंवा गावात ती असतेच, पण दोन – चार घरांच्या केवळ नाममात्र खेडयातही ती दिसते. ती धीट असून माणसांना घाबरत नाही. कावळ्याप्रमाणे मनुष्यवस्तीतील घाण नाहीशी करण्याच्या कामी तिची मदत होते. तिची उडण्याची शक्ती असामान्य आहे. तासनतास ती आकाशात बऱ्याच उंचीवर उडत असते किंवा पंख पसरून तरंगत राहते. ती उंच जाते, खाली येते, वळते व उडत असताना तिची तीक्ष्ण दृष्टी सारखी जमिनीकडे असते. एखादा बेडूक, साप, सरडा, कोंबडीचे पिलू किंवा उंदीर जमिनीवर दिसला की, ती वेगाने खाली झेप घेऊन भक्ष्यावर झडप घालून तीक्ष्ण नखांनी पकडते आणि झाडावर नेते. चोचीने भक्ष्याला ठार मारते व त्याचे लचके तोडून खाते. गांडूळ, कीटक वगैरेसुद्धा ती खाते. थोडक्यात, खाण्याजोगा कोणताही पदार्थ तिला चालतो.

        सप्टेंबर ते एप्रिलपर्यंत त्यांचा विणीचा हंगाम चालतो. उंच झाडावर नर-मादी काटक्यांचे घरटे बांधतात. घरट्यासाठी वायर, दोरा, कापूस, चिंध्या यांचाही वापर करतात. मादी मातकट-पांढऱ्या रंगाची दोन-चार अंडी घालते. त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असतात. अंडी उबविणे व पिलांना भरविणे ही कामे नर-मादी दोघेही करतात. आकाशात उंच उडत असतानाही तिचे लक्ष पिलांकडे असते. स्थानिक घारींप्रमाणे स्थलांतरित घारीही आढळतात; त्यांच्या पंखाखाली पांढऱ्या रंगाच्या खुणा असतात. स्थानिक घारी आपली हद्द ठरवून तेवढयाच क्षेत्रात वावरतात.उडत असताना किंवा स्वस्थ बसली असताना मधून मधून चीं हि हि,चीं हि असा एक प्रकारचा सुरेल आवाज काढते.


ओळख पक्ष्यांची - मोर

 

 

                    'मोर' हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.मोर हा कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. मोर हा दिसायला आकर्षक असल्याने सर्वांनाच आवडतो. मोराला पक्षांचा राजा असेही म्हटले जाते.नर पक्षास मोर तर मादी पक्षाला लांडोर या नावानेही ओळखले जाते. मोराच्या आवाजाला केकारव असे म्हणतात.केकारव म्यॉंव म्यॉंव किंवा म्यूॅंहू...म्यूॅंहू... असा भासतो.मोराचा रंगीत पिसारा , डौलदार मान, डोक्यावर असलेला निळा रंग व डोक्यावरील तुरा मोराची सुंदरता वाढवतात.मोर हा अतिशय चपळ पक्षी आहे.मोर अतिशय जागरुक असतो.थोडीशी जरी चाहूल त्याने ऐकली तरी झाडाझुडपात मोर गायब होऊन जातो.

                मोरांचे वास्तव्य सामान्यपणे दाट झुडपांमध्ये आणि विशेषेकरून नदी व ओढा यांच्या किनाऱ्‍याला असते. ते गटाने राहतात आणि वावरतात. मनुष्य वस्तीत किंवा खेड्यांच्या आसपास ते राहतात. दिवसभर खाद्य शोधत फिरून रात्री ते एखाद्या मोठ्या झाडावर विसावतात.मोराचे अन्न हे झाडाची पाने, किडे, साप, सरडे,आळी आहे. ते काही फळेही खातात. जमिनीवर पडलेली फळे, धान्ये, उंदीर, कीटक इ. ते खातात.

मोर पानझडी जंगलांत व अरण्यात राहतात. पांढरा मोर दुर्मिळ आहे. हे प्रामुख्याने मोकळ्या  जंगलात  किंवा शेतात आढळतात, जेथे त्यांना फीडसाठी बेरी आणि धान्य मिळते परंतु साप, मांजर, उंदीर आणि खार(गिलहरी) इ. खातात.वपावसाची चाहूल लागताच मोर त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो म्हणूनच आपल्याला पावसाळ्यात जास्त करून मोर दिसतात.

                     मोर हे सुंदरता व सभ्यतेचे प्रतीक मानले जाते. त्याच्या पंखांचा वापर मुकुट, सिंहासने, शाईने मजकूर लिहिण्यासाठी असा अनेक प्रकारे होतोच. मोर हा मुळचा भारतीयच आहे.अलेक्झांडरने भारतातून मोर त्याच्या देशी नेले व त्यानंतर विविध देशात मोराच्या विविध प्रजाती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मोर हा बहुभक्षी आहे. खुली मैदाने, दर्‍याखोर्‍यात ते राहतात. जंगलातील मोर सिंह अथवा अन्य प्राणी शिकारीसाठी बाहेर पडले तर जोरजोरात ओरडून अन्य प्राण्यांना सुचना देतात. मोराचा नाच हा नयनमनोहर सोहळा असतो. विशेषतः पावसाळ्यात या नाचाला बहर येतो. मोराच्या शिकारीवर भारतात बंदी आहे.वाघ, कोल्हा व रानमांजर हे मोराचे नैसर्गिक शत्रू आहेत. वाघ व बिबट्या यांसारखे प्राणी शिकारीसाठी बाहेर पडल्याचे दिसताच मोर ओरडून इतरांना सावध करतो. आपल्यावर हल्ला होणार असे दिसताच मोर वेगात पळतात. कीटकनाशके चोळलेल्या बिया खाल्ल्याने तसेच उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे मोरांचे मृत्यू होतात. असा हा सुंदर पक्षी पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण घटक आहे.म्हणून त्याच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Monday, March 22, 2021

ओळख पक्ष्यांची - पोपट


पोपट मिठू मिठू असे बोल आपल्या कानावर पडल्यावर आपल्या नजरेपुढे एकच आकर्षक पक्षी येतो तो म्हणजे पोपट.पोपट हा पक्षी आपल्या सर्वांनाच आवडतो .तो सर्वांचा चांगला मित्र आहे.पोपटाचा रंग हिरवा असतो व चोच लाल रंगाची असते.पोपटा हा मध्यम आकाराचा पक्षी असतो जो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांमध्येही आढळतो. पोपट हे वेगवेगळ्या रंगांचे आढळून येतात जसे पांढरा, निळा, हिरवा, रंगबिरंगी, पिवळा, लाल इत्यादी. जगभरात पोपटांच्या ३५०पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. पोपटाची लांबी १० ते १२ इंच असते. पोपट हा समजदार व बुद्धिमान पक्षी आहे. कोणतीही गोष्ट तो इतर पक्ष्यांच्या तुलनेत लवकर शिकतो. पोपट हा माणसाप्रमाणे बोलणे देखील शिकू शकतो.पोपट उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. त्यांच्या आहार प्रत्येक प्रजाती नुसार वेगवेगळा असतो, पोपट हे शाकाहारी असतात ते वेगवेगळ्या भाज्या, फळे, बिया इत्यादी खातात.पोपटाला मिरची,पेरु,आंबा,कवठाचे फळ,डाळींब खायला आवडते. बरेच पोपट हे आपल्या पायाच्या सहाय्याने भोजन तोंडात पोचवतात. पोपटाला नकला करायला खूप आवडते.पोपट नकला अगदी हुबेहूब करतो.उंच झुपकेदार जास्त पाने असलेल्या झाडावर राहायला पोपटाला खूप आवडते.पोपट हा पक्षी जंगली आणि पाळीव या दोन्ही गटांमध्ये मोडला जातो. तसेच हा पक्षी समूहाने राहतो.पोपट पक्षी झाडांच्या ढोलीत राहायला पसंद करतो.तसेच हा पक्षी दिसायला सुंदर असल्याने घरातील पिंजऱ्यामध्ये पोपट पाळले जातात.पोपट हा पक्षी घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत नमस्ते,राम राम म्हणून छान प्रकारे करतो. पाळीव पक्ष्याच्या रूपाने पोपट हा लोकप्रिय आहे. पोपट पकडून विक्री करणे मोठा व्यापार बनून गेला आहे.म्हणूनच घरांमध्ये पिंजऱ्यात पोपटाला बंदिस्त न ठेवता त्याला स्वतंत्र पणे आकाशात भरारी घेऊ द्यायला हवी.कारण पोपटाला बंदिस्त करण्याचा आपल्याला अधिकार नाही.

Friday, March 19, 2021

ओळख पक्ष्यांची - कावळा


   निसर्गात विविध प्रकारचे,रंगाचे खूप सुंदर-सुंदर मनोवेधक आणि डौलदार पक्षी आढळतात.लहानपणी आपण आजीकडून दोन पक्ष्यांची गोष्ट आवर्जून ऐकली असेल.एक होती चिऊताई व एक होता कावळेदादा.गोष्टीतल्या कावळ्यादादाचीच माहिती आपण आज पाहणार आहोत.
                   कावळा हा रंगाने काळा असतो.  कावळ्याच्या चोचीचा रंग काळा असतो.दोन डोळे व दोन पाय असतात. कावळा माणसाच्या वसाहतीजवळ आढळतो पण घरात किंवा जास्त लोकांच्या जवळ जात नाही. सर्वांना परिचित असा पक्षी आहे. हा पक्षी चलाख, सावध, चपळ,हुशार आहे.कावळा मानवी चेहरे ओळखण्यात हुशार समजला जातो.कावळ्याची खाण्याची अशी विशिष्ट आवड नाही तो मृतभक्षी आहे.
               गृह कावळा हा सुमारे ४२ सें. मी. आकाराचा,मानेजवळचा भाग राखाडी रंगाचा तर उर्वरीत काळ्या रंगाचा एक पक्षी आहे.गृह कावळ्याचा आकार आणि मानेजवळील राखाडी रंगाच्या छटांवरुन कावळ्याच्या किमान चार उपजाती आहेत. नर-मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. तर संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात. कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो.
             साधारणपणे एप्रिल ते जून हा काळ कावळ्यांचा वीणीचा काळ आहे. हे पक्षी जमिनीपासून किमान ३ मी. उंचीवर खोलगट, काटक्यांचे आणि मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात. मादी एकावेळी ४ ते ५ फिकट निळी-हिरवी त्यावर तुटक तपकिरी रेषा असलेली अंडी देते. नर-मादी पिलांचे संगोपन मिळून करतात. कित्येकदा कावळ्याच्या घरट्यात कोकिळा आपली अंडी सोडून निघून जाते. अशा पिलांची देखभाल कावळेच करतात.
            कावळ्याची नजर सारखी खाद्यावर असते. कुठे काही खायला मिळेल या शोधात तो नेहमी असतो.शिजलेले अन्न,भाजी, भात, धान्य, उंदीर, लहान पक्षी, त्यांची अंडी, मृत जनावरे असे सर्व प्रकारचे खाद्य हे पक्षी खातात.
                       कावळा हा झाडांवर, वीज खांबांच्या तारेवर, घराच्या छतावर जास्त बसतो. कावळा जमिनीवर तुरू तुरू गतीने चालतो. मेलेले प्राणी हे त्याचे आवडते अन्न आहे. मेलेले प्राणी खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम कावळा करतो. त्यामुळे कावळ्याला सामाजिक प्राणी सुद्धा म्हटले जाते.

ओळख पक्ष्यांची : चिमणी

 


   

    चिऊताई,चिऊताई

         माझ्या अंगणात ये

        चोचीतला खाऊ तुझा

        दे गं मला दे

               सर्वांच्याच बालपणीतला आठवणीतला पक्षी म्हणजे चिऊताई.आपल्या आयुष्यात सर्वात पहिल्यांदा ताई म्हणून कोणाचे नाव कानावर पडले असेल तर ते चिऊताईचे.कुठे तरी प्रत्येकाचे बालपण चिऊताईच्या आठवणींशी जोडले गेले आहे. अनेकांचे जेवण चिऊताईच्या घासानेच सुरू झाले. दोन पायावर टुणूटुणू उड्या मारणारी चिमणी, तिचा चिवचिवाट, एवढ्याशा पाण्यात स्नान करताना त्यांचा असलेला उत्साह आता दुर्मिळ होत चालला आहे.

                चिमणी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची.. कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे  लोकवस्ती,शहरी भाग,इथे प्रामुख्याने आढळणारा हा पक्षी जंगल,बागा,गवताळ मैदानापासून अगदी वाळवंट आणि बर्फाळ प्रदेशातही आढळतो.भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे.

               चिमणी हा पक्षी १६ सेमी.लांबी आणि २० ते ३० ग्रॅम वजनाचा असणारा आहे.माणसांवर प्रेम करणारी चिमणीचा छोटा आकार, गब्दुल बांधा, आखुड शेपूट व साधासुधा मातकट रंग, नाजूक पाय, पण भक्कम कोणाकृती चोच ही चिमणीच ओळख आहे.  चिमणीला माणसाचा सहवास अधिक प्रिय असल्याचे दिसते. माणसांवर प्रेम करणारे माणसाव्यतिरिक्त कोणी असेल तर ती चिमणी असते.

                  घर चिमणी व रानचिमणी (पितकंठी) असे महाराष्ट्रातील चिमण्यांचे दोन प्रकार आहेत. जगात चिमण्यांचे २८, भारतात सहा प्रकार असून जगात चिमणीसदृश ४३ पक्षी आढळतात. ही चिमणी चिमणी शिळेपाके अन्न, धान्य, कोळी, कीटक, नाकतोडे असे अन्न खाते. तसेच ती वर्षातून चार वेळा अंडी देते.

             चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो.

          चिमण्या पर्यावरणात न  दिसण्याची पुढिल मुख्य कारणे आहेत. झाडांची मोठय़ा प्रमाणावर तोड झाली याचा परिणाम चिमणीला घरटय़ासाठी आवश्यक जागा कमी झाल्या. तसेच बंदिस्त नाले कीटकनाशकांचा वापर यामुळे पिलांना भरण्यासाठी लागणारे किडे, कृमी, कीटक यांची संख्या कमी झाली. ध्वनिप्रदूषण, खिडक्यांवर  ग्लास पॅनलचा उपयोग आणि मोबाईल टॉवरची वाढती संख्या ही सर्व कारणे एकंदरीतच पक्षी जीवन धोक्यात आणणारी आहेत. मोबाईल टॉवरमुळे त्यांच्यातले कम्युनिकेशन बिघडते असा अभ्यास आहे. 

             जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने आपण ठरवले तर काही विधायक कृती नक्कीच करु शकतो.चिमणी वाचविण्यासाठी घराजवळ, गच्चीवर धान्य, पाणी ठेवणे, अडगळीची जागा निर्माण करणे, खोपे तयार करून ठेवणे, कीटकनाशकांचा प्रमाणात वापर करणे. शिकार न करणे,कृत्रिम घरटी,पाणी पिण्यासाठी आणि बर्ड फिडरची सोय करणे. यामुळे चिमण्यांची संख्या वाढून पुन्हा त्यांचा चिवचिवाट ऐकून आजची मुले आणखी निसर्गाजवळ जातील, त्यांचा ताण नक्कीच कमी होईल

           'चिमणी वाचवा' अभियानाची चळवळ पुन्हा जोर धरु लागली आहे.याचा सकारात्मक परीणाम म्हणजे थोड्याफार प्रमाणात चिमण्या पुन्हा दिसू लागल्या आहेत.

   'गेलेल्या चिऊताईला

    पुन्हा बोलवूया

    पर्यावरण रक्षण्या

   सज्ज होऊया'.                                             

                                                

श्रीम. सुनिता भाऊसाहेब इंगळे ( सूर्यवंशी )

न.पा.शाळा क्र.६ कोपरगाव जि.अ.नगर

प्राथमिक शिक्षिका

मो.न.९८८१४६८८३८

Wednesday, March 17, 2021

रयतेचा वाली पाक्षिक १३ साठी लेख पाठवण्यास आवाहन


 

पक्षी वाचवा अभियान...सुरुवात घरापासून



 

रयतेचा वाली पाक्षिक प्रसिद्ध.....

 🎊👇🏻💎✍🏻🙏🏻✍🏻💎👇🏻🎊 

https://online.fliphtml5.com/adlex/jkcm/


आज मंगळवार दिनांक १६ मार्च २०२१ रोजी रात्री  ठीक ९.३० वाजता *रयतेचा वाली पाक्षिक १२ ( नारीशक्ती ज्ञान -मान-सन्मान)* चे ऑनलाइन प्रकाशन प्रसिद्ध बोलक्या बाहुल्यांची सम्राज्ञी,उपक्रमशील,आदर्श शिक्षिका *मा. श्रीम.नलिनीताई  आहिरे(बाणगंगानगर ता.निफाड    जि.नाशिक)* यांच्या शुभहस्ते झाले आहे.. ...... 

याचा ऑनलाइन पुस्तकरूपातील अंक वाचण्यासाठी कृपया वरील लिंकवर हळूच टिचकी मारावी आणि ऑफलाइन वाचण्यासाठी सोबतची पीडीएफ डाउनलोड करावी, ही नम्र विनंती ! 

टीप :-  *रयतेचा वाली पाक्षिक क्र.१२* पूर्णत: जाहिरातमुक्त आणि मोफत आहे..... 

आपण याला कितीही फॉरवर्ड करू शकता...... धन्यवाद !! 

*आपला नम्र-विश्वासू, रयतेचा वाली परिवार, महाराष्ट्र* 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻



रयतेचा वाली पाक्षिक १२ (नारीशक्ती) चे प्रकाशन


 

Saturday, March 13, 2021

नगरपालिका शाळा क्र.६ मध्ये महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा ||

 


            राज्य शैक्षणिक संशोधन  व प्रशिक्षण परीषद महाराष्ट्र,पुणे आयोजित  दि.८ मार्च ते १२ मार्च या कालावधीत महिला दिन जिल्हास्तरीय आॕनलाईन कार्यक्रमात नगरपालिका शाळा क्र.६ मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात ८ मार्च रोजी शाळेतील शिक्षिका व पालक यांनी सहभाग नोंदवून इतिहासकालीन कर्तबगार स्रियांच्या वेशभूषा करुन अभिवादन केले.यात सविता साळुंके ताई यांनी राजमाता जिजाऊ,कल्पना निंबाळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,आरती कोरडकर यांनी सावित्रीबाई फुले,सुनिता इंगळे यांनी महाराणी येसुबाई,पालक शाहिन मनियार यांनी फातिमा शेख यांची भूमिका साकारुन मुलींच्या शिक्षणा विषयी उद्बोधन केले.शाळेत 'माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व' या विषयावर आधारित  वकृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवीतील यश साळुंखे,कुणाल वाहुळकर,जावेद शेख यांनी आईविषयी प्रेरणादायी विचार मांडले.महिला दिनाचे औचित्य साधून किशोरवयीन मुलींच्या समस्या व उपाय याविषयी जनजागृती व्हावी म्हणून सुनिता इंगळे व आरती कोरडकर यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्ष मुलींच्या राहत्या घरी संजयनगर भागात जाऊन मुलींना खाऊ वाटप व फूल  शाळेचे मुख्याध्यापक भरत आगळे सर व शिक्षक अरुण पगारे यांच्या हस्ते देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवण्यात आले.कोव्हिड - १९ व मुलींचे शिक्षण महिला, पर्यावरण जनजागृती व समावेशित शिक्षण यावर विद्यार्थी व पालक यांना घोषवाक्य उपक्रमात सहभागी करुन घेण्यात आले. विविध प्रकारची घोषवाक्ये विद्यार्थ्यांनी तयार केली. वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घालून त्यावरही संदेश लिहिण्यात आले होते.जनजागृतीचे या अनोख्या प्रकारचे पालकांनीही खूप कौतूक केले.शाळेत मुलींच्या शिक्षणाची जनजागृती व्हावी म्हणून  रांगोळी व चित्रकला  या उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.यात मुलांनी फळाच्या बिया,खडे व दगड,झाडाची पानेव फुले व रांगोळीचा वापर करुन उद्बोधक रांगोळी रेखाटली.यात मुली वाचवा,मुलींना शिकवा तसेच पर्यावरण जागृती याविषयी संदेश देण्यात आला. कांचन व अर्चना वाहूळकर या महिला पालकांनी दारापूढे रांगोळी काढून त्यांच्या भागात जनजागृती केली.शाळेतील पदवीधर शिक्षिका आरती कोरडकर व सविता साळुंके यांनीही रांगोळीतून मूलींच्या जन्माचे स्वागत करा असा संदेश दिला.विशेष म्हणजे हि शाळा पूर्णतः मुलांची आहे.

           नगरपालिका शाळेत शिकणारी सर्वच मुले हि अत्यंत प्रतिकूल परीस्थीतीत शिक्षण घेत आहेत.त्यातही शाळेतील काही महिला पालक हे नेहमीच आपल्या पाल्यांसाठी जाणीवपूर्वक, जागरुकपणे श्रम घेत आहेत अशा महिला पालकांच्या कामाचे कुठेतरी जाणीवपूर्वक कौतुक व्हावे,समाजात त्यांनाही मान मिळावा म्हणून अर्चना वाहूळकर,शाईन मनियार या महिला पालक भगिनींचा 'आदर्श माता' म्हणून  सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत सत्कार करुन गौरव करण्यात आला.शाळेतील शिक्षिका सुनिता इंगळे व आरती कोरडकर यांना महिला दिनीच राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका समूहाचा राज्यस्तरीय 'सुपर अॕक्टीव्ह शिक्षिका' पुरस्कार नाशिक डाएट च्या ज्येष्ठ अधिव्याख्याता संगिता महाजन यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.शाळेत राबवलेल्या उपक्रमाचे मुख्याध्यापक भरत आगळे सर,शिक्षक अरुण पगारे सर,पालक यांनी कौतुक केले आहे.नगरपालिका शिक्षण मंडळाचे कृतिशील,कर्तव्यदक्ष प्रशासनाधिकारी श्री.मोहनीश तुंबारे  साहेब यांचे अनमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन नेहमीच शाळेस मिळत असते. तुंबारे साहेबांनी शाळेत राबवलेल्या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांना शाबासकीची थाप देऊन कौतुक केले.हे सर्व उपक्रम  फेसबुकच्या माध्यमातून SCRT च्या #womendaymh2021 वर अपलोड केले आहेत.