Friday, March 19, 2021

ओळख पक्ष्यांची - कावळा


   निसर्गात विविध प्रकारचे,रंगाचे खूप सुंदर-सुंदर मनोवेधक आणि डौलदार पक्षी आढळतात.लहानपणी आपण आजीकडून दोन पक्ष्यांची गोष्ट आवर्जून ऐकली असेल.एक होती चिऊताई व एक होता कावळेदादा.गोष्टीतल्या कावळ्यादादाचीच माहिती आपण आज पाहणार आहोत.
                   कावळा हा रंगाने काळा असतो.  कावळ्याच्या चोचीचा रंग काळा असतो.दोन डोळे व दोन पाय असतात. कावळा माणसाच्या वसाहतीजवळ आढळतो पण घरात किंवा जास्त लोकांच्या जवळ जात नाही. सर्वांना परिचित असा पक्षी आहे. हा पक्षी चलाख, सावध, चपळ,हुशार आहे.कावळा मानवी चेहरे ओळखण्यात हुशार समजला जातो.कावळ्याची खाण्याची अशी विशिष्ट आवड नाही तो मृतभक्षी आहे.
               गृह कावळा हा सुमारे ४२ सें. मी. आकाराचा,मानेजवळचा भाग राखाडी रंगाचा तर उर्वरीत काळ्या रंगाचा एक पक्षी आहे.गृह कावळ्याचा आकार आणि मानेजवळील राखाडी रंगाच्या छटांवरुन कावळ्याच्या किमान चार उपजाती आहेत. नर-मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. तर संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात. कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो.
             साधारणपणे एप्रिल ते जून हा काळ कावळ्यांचा वीणीचा काळ आहे. हे पक्षी जमिनीपासून किमान ३ मी. उंचीवर खोलगट, काटक्यांचे आणि मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात. मादी एकावेळी ४ ते ५ फिकट निळी-हिरवी त्यावर तुटक तपकिरी रेषा असलेली अंडी देते. नर-मादी पिलांचे संगोपन मिळून करतात. कित्येकदा कावळ्याच्या घरट्यात कोकिळा आपली अंडी सोडून निघून जाते. अशा पिलांची देखभाल कावळेच करतात.
            कावळ्याची नजर सारखी खाद्यावर असते. कुठे काही खायला मिळेल या शोधात तो नेहमी असतो.शिजलेले अन्न,भाजी, भात, धान्य, उंदीर, लहान पक्षी, त्यांची अंडी, मृत जनावरे असे सर्व प्रकारचे खाद्य हे पक्षी खातात.
                       कावळा हा झाडांवर, वीज खांबांच्या तारेवर, घराच्या छतावर जास्त बसतो. कावळा जमिनीवर तुरू तुरू गतीने चालतो. मेलेले प्राणी हे त्याचे आवडते अन्न आहे. मेलेले प्राणी खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम कावळा करतो. त्यामुळे कावळ्याला सामाजिक प्राणी सुद्धा म्हटले जाते.

No comments: